कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  करवीर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था तसेच नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पार पडली.

बैठकीत उपविभागीय अधिकारी चौगुले यांनी सर्व पोलिस पाटील व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना सुरू असल्याने ते कामकाज शांतता व कायदेशीररित्या पार पडावे, यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः संभाव्य पुरपरिस्थिती लक्षात घेता, सर्व संबंधित गावांतील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी व पोलिस पाटील यांनी पूर्वतयारी ठेवावी. पुरामुळे रस्ते बंद झाल्यास तात्काळ बॅरिकेटिंग करून त्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीला पोलीस उपअधीक्षक, सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, करवीर व गगनबावडा तहसीलदार, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.