ठाकरेंचे खासदार फुटल्याची चर्चा, एकनाथ शिंदेच स्पष्टीकरण
मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूंकप होण्याची शक्यता वर्तवली जात असून शिवसेना ठाकरे पक्षाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिल्यानंतर दोन्ही शिवसेना पक्षासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या असून माझी उद्धव ठाकरेंच्या पक्षातील कोणत्याही खासदारासोबत बैठक झाली नसल्याचं सांगितलं आहे.

शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर' बाबत राजकीय वर्तुळात चर्चा समोर आल्यानंतर ठाण्यात याबाबत बैठक झाली असल्याचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही," असं शिंदे यांनी सांगितलं आहे. तर, "उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. ती केवळ अफवा असून सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे," असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे.




