मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे गरजेचे - पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील

मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे गरजेचे - पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील

करवीर (प्रतिनिधी) - कोगे करवीर येथे शिव शाहू विचार मंचच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींच्याकडे मोबाईल आहे. त्याचा वापर हा चांगल्या कामासाठी करणे गरजेचे आहे. मुलींनी संरक्षण करण्यासाठी जिदो कराटे यासारखे संरक्षण धडे घेणे आवश्यक आहे. शासन स्तरावर प्रत्येक  शाळेमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. आपल्या गावातील शाळेतही पालकांनी पुढाकार घेऊन मुलींना स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू करावेत असे आवाहन सातारा शहर महिला कक्ष पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी यावेळी केले. 

प्राध्यापिका प्रतिज्ञा कांबळे म्हणाल्या, जुन्या रुढी परंपरांना स्त्रीयांनी विरोध करावा. सावित्रीबाई फुले यांनी फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले नाही तर स्त्रियांच्या विरोधात असणा-या सतिची चाल,विधवा स्त्रियांचे केश अर्पण अशा अनिष्ट रूढी व परंपरा यांना विरोध केला. आजही विधवा महिलांना समाजात दुय्यम स्थान दिले जाते. यासाठी महिलांनी अनिष्ट रूढी व परंपरा यांना विरोध करावा हीच खरी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असेही सांगितले .

अंधश्रध्दा निर्मूलन समिती कोल्हापूर शहर कार्याध्यक्ष स्वाती कृष्णा म्हणाल्या, अंधश्रद्धा, भानामती करणी अशा विविध भीतीदायक आघोरी विद्यांचे आपण गुरू आहोत असे सांगत काही लोक समाजामध्ये भीती दाखवत आहेत. अशिक्षित व समाज घातक वैचारिकांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. जर भानामती व करणी करून चांगले वाईट करता आले असते तर जे हे करतात ते पैसे घेऊन का करतात व ते स्वतः चे चांगली का करत नाहीत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला ? त्यामुळे समाजाने अशा गोष्टीला महत्त्व न देता चांगले विचार तरुण पिढीला रुजवणे गरजेचे आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा पाटील यांनी व आभार जान्हवी कांबळे यांनी मानले.

यावेळी शिवशाही विचार मंचाच्या वतीने मान्यवरांना पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच आंबुबाई पाटील, माजी सरपंच बनाबाई यादव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष स्वाती कृष्णा व इतर सदस्य, शिवशाही विचार मंचचे पदाधिकारी तरुण वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.