राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला 'हा' आदेश

मुंबई - "आम्ही दोघं भाऊ वीस वर्षांनी एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही एकमेकांशी वाद का करताय?" असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कुठलेही वाद बाजूला ठेवून निवडणुकीच्या तयारीत जुटण्याचे स्पष्ट आदेश दिले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा, समन्वय वाढवण्याचाही सल्ला दिला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मतदार याद्यांचा नीट अभ्यास करण्याचे निर्देश दिले. "जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पुन्हा सोबत घ्या. जे पक्षापासून दूर गेले आहेत, त्यांना परत आणा," असं आवाहनही त्यांनी केलं.
"जर आम्ही दोघं भाऊ वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर येऊ शकतो, तर तुम्हीही तुमचे आपसातले मतभेद विसरून एकत्र काम करा," असा राज ठाकरे यांचा सल्ला असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मुंबई महापालिकेवर आपलीच सत्ता येणार, असा आत्मविश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. "हे मी टाळ्यांसाठी सांगत नाही. मनसे पुन्हा एकदा बळकट करण्याची ही संधी आहे. त्यामुळे जुने जाणकार कार्यकर्ते सोबत घ्या आणि तयारीला लागा," असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.