शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला शरद पवार यांची सदिच्छा भेट
यड्राव (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधला आहे' असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी काढले.यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला शरदचंद्र पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांची, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती घेतली.

या प्रसंगी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालय परिसरात आगमन होताच शरद पवार यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शरदचंद्र पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाची उपलब्धता वाढविण्याची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, अशा संस्था विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीची माहिती मान्यवरांना देण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि कौशल्य विकास यावर भर देत संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य करीत असल्याची माहिती अनिल बागणे यांनी दिली.
या कार्यक्रमास आमदार राहूल आवाडे, माजी आमदार राजीव आवळे, बाबासाहेब पाटील आसूर्लेकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, आदित्य पाटील यड्रावकर, अजय पाटील यड्रावकर,जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.




