सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट

सेनापती कापशी (प्रतिनिधी): सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे येत्या गळीत हंगामात दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचा विश्वास, अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या गळीत हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच साखर कारखाना साडेआठ ते नऊ हजार टन वाढीव गाळप क्षमतेने सुरू होईल, असेही ते म्हणाले.

बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तेराव्या गळीत हंगामासाठीच्या मिल रोलरचे पुजन चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. 

       भाषणात नविद मुश्रीफ म्हणाले, गेल्या वर्षी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यामध्ये झालेला करार व त्रिपक्षीय करारच्या शिफारसीनुसार प्रत्येकवर्षी पगारामध्ये वार्षिक वाढ देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आपणा सर्वांचे लोकलाडके नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिपक्षीय करारानुसार दि.  एक एप्रिल २०२६ पासून वार्षिक पगारवाढ लागू केली जाणार आहे. सदरची रक्कम मूळ वेतनामध्ये वाढविण्यात येईल. वाढीव गाळत क्षमता आणि दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाढीव क्षमतेने ऊस पुरवठा होण्यासाठी ऊसतोडणी व वाहतूक यंत्रणा भरताना २६ मॅकॅनिकल हार्वेस्टर व इतर ८५० वाहने, अशी तोडणी यंत्रणा भरण्याचे काम सुरु आहे. ते पुढे म्हणाले, कारखान्याने मागील हंगामतील सर्व शेतकऱ्यांची  ऊस, वाहतूक, कमिशन, डिपॉझीट अशी सर्व बिले वेळेत आदा केली असून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन तोडणी-वाहतुकीचे करार सुरू केले आहेत. या  यंत्रणेचा पहिला ॲडव्हान्स आजरोजी देण्यात येत आहे.

       उसाच्या कमी उपलब्धतेमुळे साखर कारखाने सरासरी ११० दिवसापेक्षा कमी चालतात. ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय.  तंत्रज्ञानाचा नवा प्रगोय यशस्वी करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणेतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट,  बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नाने १०० एकरपेक्षा जादा शेतीमध्ये हा प्रयोग सुरू आहे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर रु. २५०००/- इतका खर्च येत आहे. व्ही. एस. आय. कडून रू. १८, २५०/- व के. डी. सी. सी. बँकेकडून रू.  ९०००/- इतके अनुदान दिले जाते. शेतकऱ्याला काहीही खर्च येत नाही. २५ ते ३० टक्के खताचा व पाण्याचा कमी वापर करून ऊस उत्पादनामध्ये ५० ते ६० टक्के वाढ होऊन अंदाजे एकरी १०० तम उत्पादनाचा तज्ञांचा अंदाज आहे. विक्री ऊस उत्पादन वाढीमुळे लवकरच जास्तीतजास्त शेतकरी हे तंत्रज्ञान वापरतील. येत्या चार-पाच वर्षामध्ये सर्व शेतकरी ऊस शेतीमध्ये ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करतील.

        या हंगामामध्ये सहवीज निर्मिती प्रकल्प एकुण १७३ दिवस चालला.  त्यामधून एकूण सहा कोटी, एकोणऐंशी लाख युनिट वीज निर्यात केली आहे. आजपर्यंत डिस्टीलरी १७३ दिवस सुरु असून आजपर्यंतचे स्पिरीटचे एकुण उत्पादन एक कोटी, तेवीस लाख इतके झाले आहे. पुढील सिझन पूर्ण वाढीव क्षमतेने वेळेत सुरू करणार असून सर्व सभासद व जास्ती जास्त शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे. कार्यक्रमात ऊस तोडणी वाहतूकदारांना ॲडव्हान्स धनादेश, मृत कामगारांच्या वारसदारांना विमा रकमेचे धनादेश, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. 

       स्वागत लेबर ऑफिसर संतोष मस्ती यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार चीफ इंजिनियर मोहन पोवार यांनी मानले. यावेळी जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.