सावरवाडी फाट्यावर एकेरी मार्गावरील काँक्रिट रस्त्यावर चारचाकी वाहन अडकले : अपघात टळला, बालिंगा - दाजीपूर राज्यमार्गाच्या अपुऱ्या कामांबाबत प्रश्नचिन्ह?

सावरवाडी फाट्यावर एकेरी मार्गावरील काँक्रिट रस्त्यावर चारचाकी वाहन अडकले : अपघात टळला, बालिंगा - दाजीपूर राज्यमार्गाच्या अपुऱ्या कामांबाबत प्रश्नचिन्ह?

विश्वनाथ मोरे (तालुका प्रतिनिधी ) : बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील अपूर्ण रस्ते कामांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. सावरवाडी फाटा ( ता. करवीर) येथे समोरील वाहनाला साईट देण्याच्या नादात एकेरी मार्गावरील काँक्रिट रस्त्यावरून एक चारचाकी वाहन खाली जाऊन रस्त्यावरच अडकली. काँक्रिट रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी सळ्यांमुळेही धोका वाढला आहे. सुदैवाने चालकाने वेळीच वाहनावरील नियंत्रण मिळविल्याने अपघात टळला. 

सावरवाडी फाटा येथे राज्यमार्गाच्या एका बाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंमध्ये उंचीचा फरक निर्माण झाला आहे. याच ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना चारचाकी वाहन काँक्रिट रस्त्याच्या कडेवरून खाली उतरले आणि लोखंडी सळ्यांमध्ये अडकले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत वाहन सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपूर्ण रस्ते कामे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले.