स्त्रीजीवनावर आधारित गीतांच्या सुरेल मैफिलीने कागलकर रसिक मंत्रमुग्ध
कागल (प्रतिनिधी) - स्त्री जीवनाच्या विविध पैलूंना सुरेल अभिव्यक्ती देत, स्त्री कलाकारांच्या कलाविष्काराने सजलेल्या ‘कजरा मोहब्बतवाला’ या संगीत मैफिलीने कागलकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अजरामर गीतांनी रंगलेली ही मैफल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलमध्ये पार पडली.

श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्था, कागल संचालित राजे दिलीपसिंह ज. घाटगे कर्णबधिर निवासी विद्यालयासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्वरसांगाती’ कोल्हापूर आयोजित आणि ‘स्वरसांगाती सूरसखी – पुणे’च्या कलाकारांनी सादर केलेल्या या गीतसंध्येला रसिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी नवोदिता घाटगे म्हणाल्या, या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील प्रकाशवाट आपण सर्व मिळून उजळूया.आपली मदत या मुलांसाठी अमूल्य ठरेल.त्यांच्या जीवनात आशा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश पसरविण्यासाठी समाजाने पुढे यावे. कार्यक्रमाची सुरुवात मुकबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतमय मुजऱ्याने झाली.
कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी राजे दिलीपसिंह घाटगे विद्यालयाचा ज्ञानाचा उजेड -
कागल संस्थानच्या राजमाता श्रीमंत विजयादेवी घाटगे यांच्या दूरदृष्टीतून आणि शाहू साखर कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेले ‘राजे दिलीपसिंह ज. घाटगे कर्णबधिर निवासी विद्यालय’ आज अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनातील बदलाचे केंद्र बनले आहे. त्यांच्या निधनानंतरही हे कार्य अखंडपणे सुरू ठेवत,कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम सुहासिनीदेवी घाटगे (अध्यक्षा, शाहू साखर कारखाना), राजे समरजितसिंह घाटगे (अध्यक्ष, शाहू ग्रुप) आणि संस्थाध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, निवास, भोजन, वस्त्र, आरोग्य आणि सर्व सुविधा पुरवल्या जातात. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग असून नियमित शिक्षणाबरोबरच चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, कौशल्य विकास यांनाही पुरेपूर वाव दिला जातो. आजवर सुमारे ४५० विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन समाजात आत्मविश्वासाने पुढे जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम रुजवण्यासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रमही राबवले जातात.हे विद्यालय शब्दांऐवजी मनाने ऐकणाऱ्या आणि भावनेने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे दुसरे घरच बनले आहे.




