'अख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय, मला रणनीतीकारांची गरज नाही'; प्रशांत किशोर-भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर सुरू झालेल्या चर्चांवर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आहोत. अख्खा महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय. त्यामुळे मला रणनीतीकारांची गरज नाही," असं तटकरे यांनी स्पष्टपणे म्हटलं.

प्रशांत किशोर यांनी बिहारमधील विजयानंतर मुंबईत सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. या बैठकीत सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीबाबत काही प्रश्न उपस्थित झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत बोलताना तटकरे म्हणाले, "ही एक औपचारिक भेट होती. त्यात नेमकी काय चर्चा झाली, याची मला माहिती नाही."
तटकरे पुढे म्हणाले,"मी आयुष्यात कधीही निवडणुकीचा सर्व्हे केलेला नाही. गावागावातील लोक, तरुण आणि कार्यकर्त्यांना भेटूनच परिस्थितीचा अंदाज घेतो. मला राज्याचा कानाकोपरा माहिती आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राजकारणाची मला पूर्ण माहिती आहे."
प्रशांत किशोर पक्षासाठी काम करत आहेत का, याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली. "त्यांची अधिकृत नियुक्ती झाली असती, तर त्याची माहिती मला नक्कीच असती. सल्ला मिळाला तर त्याचं स्वागत आहे, पण पक्षसंघटना उभी करताना जनतेच्या अपेक्षा आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहेत," असं त्यांनी सांगितलं.
याशिवाय तटकरे म्हणाले, "काल सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली, असा अर्थ काढण्याचं कारण नाही. आम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आहोत. प्रशांत किशोर यांची राजकीय भूमिका वेगळी असू शकते, पण आमची भूमिका स्पष्ट आहे."
शेवटी त्यांनी सांगितलं, "सर्व्हे करणं चुकीचं नाही. पण आम्ही प्रॅक्टिकल राजकारण करणारे लोक आहोत. मला माझं राजकीय गोत्र माहिती आहे आणि राज्यातील परिस्थितीचाही अचूक अंदाज आहे."




