‘अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

‘अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सुरू असलेल्या ‘अतिसार थांबवा’ अभियानाची जिल्ह्यातील दुर्गम भागांत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘ओआरएसबाबत जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभियान कालावधीत उपलब्ध ओआरएस पाच वर्षांखालील बालकांच्या घरी थेट वाटप करण्यात यावे. दुर्गम व ग्रामीण भागांतही हे अभियान पोहोचवले जावे. विभागाकडून उपलब्ध ओआरएसचा वापर शंभर टक्के होईल, यासाठी योग्य नियोजन करावे.’ ओआरएस तयार करण्याची प्रक्रिया आणि त्याचा वापर याबाबत प्रात्यक्षिक व्हिडिओ तयार करून गावोगावी जनजागृती करण्यात यावी. अतिसार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी व्यापक प्रचार व संवाद यावर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

‘अतिसारावर करू मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊन साथ’ हे उद्दिष्ट समोर ठेवून अतिसार असलेल्या सर्व मुलांसाठी ओआरएस व झिंकचे वाटप होईल आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन करावे. अति जोखमीच्या क्षेत्रांमध्ये, जसे की झोपडपट्ट्या, वीट भट्ट्या, पूरग्रस्त भाग आणि दुर्गम भागांतील दुर्बल घटक, यांच्यावर विशेष लक्ष द्यावे. या सर्व कृतींसाठी विविध विभागांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महिला व बालविकास विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नागरी विकास विभाग, ग्रामीण विकास विभाग तसेच शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण कामगिरी करणे अपेक्षित असल्याचेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.