अब्दुल सत्तारांना पाठिंबा, गायकवाडांची महायुतीवर नाराजी

अब्दुल सत्तारांना पाठिंबा, गायकवाडांची महायुतीवर नाराजी

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीला घरचा आहेर दिला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही असंही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय. माझ्या मतदारसंघातही मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असल्याचं रोखठोक वक्तव्य त्यांनी केली आहे. 

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची प्रवासादरम्यान गळाभेट झाल्याचे देखील पाहायला मिळाले, यामुळे या राजकीय चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. यासंदर्भात आता, बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात ५० आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षासोबत सत्तेमध्ये सोबत आले.

अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा ही खरी आहे, सातारा प्रकरणाचा संदर्भ देत राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांना मारहाण झाल्यानंतर देखील कारवाई झाली नाही हे, महाराष्ट्राने बघितले आहे, असे सांगत अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा ताई पवार यांना अजूनही अर्थ खाते मित्र पक्षाकडून मिळालेले नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत ही आमच्यासारखा खेळ होतो का? असे दिसून येत असल्याच आमदार संजय गायकवाड म्हणालेत. माझ्या मतदारसंघात देखील मित्र पक्षाचा हस्तक्षेप होत असून, अशाप्रकारे मित्रपक्ष असताना एकमेकांचे कच्चीकरण करणे हे महायुतीसाठी हिताचे नाही असेही आमदार गायकवाड यांनी सांगितले.

ठाण्यात एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील आमदारांमधील बैठक रात्री उशीरा संपली, एकनाथ शिंदे यांची छत्रपती संभाजीनगरमधील आमदार खासदारांसोबत मध्यरात्री ठाण्यात खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. आयोजित केलेली बैठक ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी संदर्भात असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर अब्दुल सत्तार यांच्या नाराजीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असल्याचे देखील सांगितले आहे.