राम मंदिर कुणाच्या बापाची जहागिरदारी नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात रामरक्षा पठण आंदोलन केले. याआधी दादर आणि ठाणे येथेही अशाच प्रकारचे आंदोलन करण्यात आले होते. नागपुरातील आंदोलनाला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करत, राम मंदिर कुणाच्या बापाची जहागिरदारी नाही. आता 'भाजपमुक्त राम' आंदोलनाची सुरुवात झाली आहे,असे म्हणत रामभक्तांच्या श्रद्धेवर दरोडा टाकल्याचा आरोप केला.

तरुणांना न्याय मिळणे हेच आमचे हिंदुत्व असल्याचे सांगत त्यांनी पेपरफुटीच्या घटनांवरूनही सरकारला लक्ष्य केले. तसेच बाबरी मशिद प्रकरणाचा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण करून दिली.
ठाकरे यांनी पुढे गद्दार आमदारांवरही निशाणा साधत, भाजपने दगाबाजी केल्यामुळेच महाविकास आघाडी स्थापन करावी लागली, असे म्हटले. काशी विश्वनाथ आणि अयोध्येत जाऊन आरती करणार असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करत, राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिरातील कथित चोरांच्या, हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.राज्य सरकारवर टीका करत त्यांनी शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी आणि महिलांसाठीच्या योजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय, सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या समर्थनार्थ उद्या आंदोलन करणार असल्याची घोषणा करत, सर्व पक्षांनी देशहितासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.




