अशोक खरातवर चित्रपट; दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे वक्तव्य

अशोक खरातवर चित्रपट; दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांवर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आलं आणि अख्खा महाराष्ट्र हादरला. एवढंच काय तर, भोंदूगिरी करणारा कॅप्टन अशोक खरात आणि त्याच्यासोबतचे राजकारण्याचे लागेबांधे समोर आले आणि राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. अनेक महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटून ओरबाडणाऱ्या अशोक खरातला बेड्या ठोकण्यात आल्यात. अशातच आता महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या या अशोक खरातवर सिनेमा येत असून शिवसेना नेत्या आणि 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात एका राजकारण्याची भूमिका साकारणार असल्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना केलाय. पण, दीपाली सय्यद यांनी सिनेमा आणि त्यातल्या भूमिकेविषय खुलासा केल्यापासून आपल्याला धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

भोंदूबाबा, नराधम अशोक खरात प्रकरणावरच्या सिनेमाचं शुटिंग लवकरच सुरू होणार असून सिनेमात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी सिनेमात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असं म्हणत दीपाली सय्यद यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावाच त्यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणावर सिनेमा येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकारावर दबाव आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे, असं शिवसेना नेत्या, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटलंय. तर, आता दीपाली सय्यद यांना येणाऱ्या धमक्यांवर आता शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

दीपाली सय्यद यांनी त्यांना येत असलेल्या धमक्यांसंदर्भात जे दावे केले, त्याबाबत शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एका वृत्तवाहिनीकडे भूमिका मांडली आहे. दीपाली सय्यद यांच्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमात कुणी काम करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. कुणीही यात राजकारण आणण्याचं कारण नाही, धमक्यांसंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असं योगेश कदम म्हणाले आहेत.