आईची शपथ घेऊन गद्दारी केली" उद्धव ठाकरेंचा संजय देशमुखांवर घणाघात, भरसभेत दाखवला जुना व्हिडिओ

आईची शपथ घेऊन गद्दारी केली" उद्धव ठाकरेंचा संजय देशमुखांवर घणाघात, भरसभेत दाखवला जुना व्हिडिओ

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (ठाकरे गट) सोडून सहा खासदारांनी बंड केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक झाले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन जनतेशी थेट संवाद साधण्याची मोहीम त्यांनी सुरू केली असून, आज त्यांनी वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओ उपस्थितांना दाखवला. या व्हिडिओमध्ये देशमुख "आईची शपथ" घेत आपण उद्धव ठाकरेंसोबत आणि शिवसेनेसोबत कायम राहणार असल्याचे सांगताना दिसत आहेत. याच मुद्द्यावरून ठाकरेंनी त्यांच्यावर टीका करत,"आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल?"असा भावनिक सवाल उपस्थित केला.

या व्हिडिओमध्ये संजय देशमुख म्हणतात की,"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक वाक्य मला आजही आठवते..संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीला जात-पात न पाहता धावून जा. आज शिवसेना संकटात होती, त्यामुळे माझ्या ८३ वर्षांच्या आईनेही मला शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्यास सांगितलं.

यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले,"आईची शपथ घेऊन ज्याने विश्वासघात केला, त्याला जनतेने जाब विचारलाच पाहिजे. शिवसेना संकटात असताना तुम्ही साथ देण्याची शपथ घेतली होती, मग आज हा विश्वासघात का?"

यावेळी ठाकरेंनी भाजप आणि बंडखोरांवरही निशाणा साधत, "पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आमदार फोडले.. पण शिवसेना संपली नाही. जनतेने मशाल चिन्हावर नऊ खासदार निवडून दिले. मग पुन्हा पक्ष फोडण्याची गरज का पडली?"असा सवाल उपस्थित केला.तसेच, "मोदींच्या लाटेवर खासदार निवडून आल्याचा दावा करणाऱ्यांना महाराष्ट्रानेच उत्तर दिलं. भाजपला रोखत महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. मग ती लाट कुठे गेली?"असा टोला त्यांनी लगावला.

सभेच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे आभार मानत, "पावसाळा आला की नवीन कोंब फुटतात. काही सडलेली पानं गळून गेली तरी नव्या निष्ठावान शिवसैनिकांच्या रूपाने शिवसेना पुन्हा उभी राहील,"असा विश्वास व्यक्त केला. बंडखोरांवर टीका करत त्यांनी "५० खोके, एकदम ओके" या जुन्या घोषणेची आठवण करून देत, आता "आमदारांचा भाव ५० खोके असेल तर खासदारांचा किती?"असा खोचक सवालही उपस्थित केला.