आता उद्धव ठाकरे , संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठविणे बाकी... असं का म्हणाले संजय राऊत?

आता उद्धव ठाकरे , संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठविणे बाकी... असं का म्हणाले संजय राऊत?

नाशिक : ‘हा इकडे चालला, तो तिकडे चालला, अशा अफवा तीन-चार महिन्यांपासून शिवसेनेच्या बाबतीत उठविल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठविणे तेवढे बाकी आहे. परंतु अशा कितीही अफवा उठल्या तरी नाशिकमधील शिवसैनिक जागेवरच आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत स्पष्ट केले आहे.  सर्वांनी १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यातून आपली ताकद दाखवून द्या,’ असे आवाहनही  संजय राऊत यांनी रविवारी केले.

गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे १६ एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जिल्ह्यातील जागा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असा जनतेचा कौल होता. सुधाकर बडगुजर व वसंत गिते यांचे काम चांगले होते. परंतु विजय मिळू शकला नाही. आता सावध होऊन पुन्हा उभारी घ्यावी लागेल.’

‘वक्फ विधेयकाविरुद्ध कोर्टात जाणार नाही’

दरम्यान, सरकारमध्ये वक्फ विधेयक मंजुर करण्यात आलं आहे. या विधेयकावर राज्यभरासह देशात आरोप - प्रत्यारोप होताना दिसत आहेत. वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरे यांनीही सरकारला टोला लगावला आहे. ‘वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल, तर जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल,’ अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.