आमदार-खासदार विकत घेतले, आता पुरस्कारही विकत घ्यायला लागलेत ; छ. संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

आमदार-खासदार विकत घेतले, आता पुरस्कारही विकत घ्यायला लागलेत ; छ. संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील प्रलंबित विकासकामे, रखडलेले प्रकल्प आणि सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनाचा गुरुवारी (१७ सप्टेंबर) समारोप झाला. या समारोपाच्या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी ठाकरेंनी विविध मुद्यांवरून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘पुरस्कार श्री’ म्हणत साधला निशाणा
भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. त्यांनी शिंदेंचा उल्लेख ‘पुरस्कार श्री’ असा करत, त्यांनी स्वतःच स्वतःसाठी पुरस्कार विकत घेतल्याचा गंभीर आरोप केला. "ते आमदार-खासदार तर विकत घेत होतेच, पण आता ते पुरस्कार सुद्धा विकत घ्यायला लागले आहेत," अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली. तसेच, "हा निर्लज्जपणा आपल्याला जमणार नाही, जो हमने किया, पुरस्कार खरीद लिया, ये तुमसे ना हो पाएगा!" असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींवर टीका
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना ठाकरेंनी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्सचा समाचार घेतला. "मोदींच्या वाढदिवसाचे छान बोर्ड लागले आहेत. ते नुसते बोर्ड बघून मला असे वाटले की मराठवाड्यात काय आनंदी आनंद आहे, इकडे दुष्काळ कुठे? पण जमिनीवर काय वास्तव आहे, हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही," असे ते म्हणाले.

गद्दारांना छातीठोक आव्हाण
मराठवाड्याच्या विकासाचे नाव घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी तिकडे गेलेल्या सर्व गद्दार आमदार-खासदारांना ठाकरेंनी थेट आव्हान दिले. "तुमच्यात हिंमत असेल, तर मराठवाड्याच्या व्यथा छातीठोकपणे पंतप्रधानांसमोर मांडू शकता का?" असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरातून सरकारविरोधात रणशिंग फुंकले.