कोल्हापुरात पाणीपुरवठा विभागाची धडक कारवाई; ७ थकबाकीदार अन् १ अनधिकृत नळ कनेक्शन कट

कोल्हापुरात पाणीपुरवठा विभागाची धडक कारवाई; ७ थकबाकीदार अन् १ अनधिकृत नळ कनेक्शन कट

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभाग आणि उपद्रव शोध पथकामार्फत शहर व संलग्न ग्रामीण भागातील थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत मोठ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन खंडित करण्यासोबतच अनधिकृत नळ जोडण्यांवरही कडक कारवाई केली जात आहे.

एकाच दिवसात ७ कनेक्शन खंडित
पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (१७ सप्टेंबर) शहरातील विविध भागांमध्ये संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान पाणीपट्टीचे पैसे न भरणाऱ्या ७ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले, तर १ अनधिकृत नळ कनेक्शनही खंडित करण्यात आले. या धडक कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

३ लाख ८३ हजारांची वसुली
या विशेष मोहिमेदरम्यान पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी नागरिकांकडून एकूण ३ लाख ८३ हजार २१ रुपये इतकी रोख रक्कम वसूल करण्यात आली आहे. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे पाणीपट्टी वसुलीस गती मिळाली आहे.

अधिकारी व पथकाचा सहभाग
सदर कारवाई महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे व पाणीपट्टी अधीक्षक बळवंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वसुली पथकप्रमुख बाबासाहेब पठाण, संजय चौगले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण, दादा पाटोळे, अरुण प्रभावळे, विजय हेगडे आणि ओंकार मधाळे यांनी सहभाग घेतला. महापालिकेची ही कठोर कारवाई आगामी काळातही अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.