गडचिरोलीतील खाण प्रकल्पाला विरोध; वन्यजीव संरक्षण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित खाण प्रकल्पाला शिवसेना (ठाकरे गट) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गडचिरोलीतील हेद्री आणि परिसरातील गावांमध्ये खाण प्रकल्पाला मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की, संबंधित क्षेत्र संरक्षित व्याघ्र मार्गिका (टायगर कॉरिडॉर) म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या भागात खाणकामास परवानगी देणे वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक असून हा प्रकल्प तातडीने रद्द करून संपूर्ण परिसराला अधिकृत टायगर कॉरिडॉरचा दर्जा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठाकरे म्हणाले की, 28 एप्रिल 2026 रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) श्रीनिवास रेड्डी यांना ही जमीन खाणकामासाठी वापरता येईल का, याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र वन्यजीव संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करून जंगल क्षेत्र खाण कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र पाठवून श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्याची मागणीही केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
ताडोबा आणि इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांच्या दरम्यान हा व्याघ्र मार्गिका परिसर असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील वाघ संवर्धनासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात खाणकामास परवानगी देण्यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची (NTCA) मंजुरी आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 13 मे 2026 रोजी PCCF कार्यालयाकडून संबंधित क्षेत्र व्याघ्र मार्गिका नसल्याचे पत्र देण्यात आले. एप्रिल आणि मे महिन्यातील अधिकृत पत्रव्यवहारात विरोधाभास असल्याचा दावा करत ठाकरे यांनी याबाबत सखोल चौकशीची मागणी केली.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुरू असलेल्या आंदोलनाचाही उल्लेख केला. सरकार विरोधकांच्या आंदोलनांना घाबरत आहे का, हा खरा प्रश्न असल्याचे सांगत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.




