जंतर-मंतरवरील आंदोलनाला अनोखा पाठिंबा; नागालँडच्या तरुणाची ६८ हजारांच्या पिझ्झाची ऑर्डर चर्चेत

जंतर-मंतरवरील आंदोलनाला अनोखा पाठिंबा; नागालँडच्या तरुणाची ६८ हजारांच्या पिझ्झाची ऑर्डर चर्चेत

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. मात्र, नागालँडमधील एका तरुणाने दिलेला अनोखा पाठिंबा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

या तरुणाने आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांसाठी तब्बल १५० 'फार्महाऊस चीझ बर्स्ट' पिझ्झा ऑर्डर केले. या ऑर्डरची किंमत जवळपास ६८ हजार रुपये इतकी होती. त्याने डोमिनोजच्या ऑर्डरचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केला आहे.आपल्या पोस्टमध्ये तो लिहितो, "मी नागालँडमध्ये आहे, पण दिल्लीत माझे भाऊ-बहिणी चांगल्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी लढत आहेत. मी तिथे प्रत्यक्ष जाऊ शकलो नाही, म्हणून किमान एवढं तरी करू शकतो, असं मला वाटलं."

ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी पार्टनरने विचारलं की पिझ्झा कोणाला द्यायचा. त्यावर तरुणाने सांगितलं, "ज्यांनी अजून जेवण केलेलं नाही, अशा आंदोलनकर्त्यांना हा पिझ्झा द्या."तरुणाच्या म्हणण्यानुसार, हे ऐकून डिलिव्हरी पार्टनर भावूक झाला आणि म्हणाला, "तुम्ही त्या लोकांसाठी देवासारखे आहात." हा क्षण आपल्या मनाला स्पर्श करून गेला, असंही त्या तरुणाने पोस्टमध्ये नमूद केलं.

त्याने स्पष्ट केलं की ही पोस्ट स्वतःचं कौतुक व्हावं म्हणून नाही, तर दूर राहूनही आंदोलनाला कशी मदत करता येते, हे लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने शेअर केली आहे.ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. काहींनी त्याच्या संवेदनशीलतेचं आणि मानवतेचं कौतुक केलं, तर काहींनी "तुमच्यासारख्या लोकांमुळेच समाजात माणुसकी जिवंत आहे," अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या.