टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET.. महाराष्ट्र पुन्हा हादरला
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील लाखो शिक्षक पदाच्या इच्छुकांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 जून 2026 रोजी होणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. कारण, परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी NEET पेपरफुटीने देशभरात खळबळ उडाली होती, आणि आता TET पेपरफुटीमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यभरातील 37 शहरांमध्ये तब्बल 1028 परीक्षा केंद्रांवर TET परीक्षा आयोजित करण्यात आली होती. NEET प्रकरणानंतर यावेळी सुरक्षेचे कडक उपाय करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, 27 जूनच्या पहाटे गुप्त माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी धाड टाकली. तेथे काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची माहिती असल्याचा संशय होता.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली असता, संशयितांकडे असलेले काही प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत परीक्षा परिषदेनं 28 जूनची TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणातच व्हावी, यासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याचं परिषदेनं स्पष्ट केलं आहे. नव्या परीक्षेच्या तारखेबाबतची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
पेपरफुटीनंतर परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सुमारे 6 लाख 26 हजार परीक्षार्थींना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. पुढील 2 ते 3 दिवसांत नव्या परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. तसेच राज्यातील 1028 केंद्रांवर परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाईल.
दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. NEET पेपरफुटीचा अनुभव ताजा असताना TET परीक्षेतही अशीच घटना घडणं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या, "टीईटीचा पेपर फुटणं म्हणजे केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे. प्रत्येक वेळी पेपर फुटतो, चौकशी होते, काही जणांना अटक होते आणि काही दिवसांनी सर्व काही शांत होतं. पण विद्यार्थ्यांचा गेलेला वेळ, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास याची भरपाई कोण करणार?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.




