तुकाराम मुंढेंच्या सावजी विधानावरून वाद! हॉटेल चालक संतापले, आमच्या घरी या, खरी चव चाखा
मुंबई (प्रतिनिधी) : नागपुरातील प्रसिद्ध सावजी मटण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सावजी हॉटेल चालक आणि सावजी प्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

मुंढे यांनी सावजी पदार्थ अतितेलकट असल्याचं सांगत, अशा प्रकारचं अन्न आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता सावजी हॉटेल चालकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
हॉटेल चालकांचं म्हणणं आहे की, सावजी हा केवळ पदार्थ नसून नागपूरची खाद्यपरंपरा आणि ओळख आहे. जर सावजी इतकं घातक असतं, तर नागपुरातील हजारो लोक दररोज ते खाल्ले नसते. काहींनी तर मुंढेंना आमच्या घरी या आणि खरी सावजी चाखा" असं खुलं आमंत्रणही दिलं आहे.
सावजी समाजाच्या प्रतिनिधींनीही या वक्तव्याचा निषेध करत, यामुळे सावजी ब्रँडची प्रतिमा खराब होत असल्याचं म्हटलं आहे. गरज पडल्यास मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, आहारतज्ज्ञांचं मत मात्र थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते, सावजी मसाल्यातील घटक आरोग्यासाठी चांगले असले तरी तेलाचं प्रमाण नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.
विशेष म्हणजे, काही ठिकाणी सावजीच्या नावाखाली अतितेलकट आणि चुकीच्या पद्धतीने बनवलेले पदार्थ विकले जात असल्याने मूळ सावजी खाद्यसंस्कृतीची बदनामी होत असल्याचंही मत व्यक्त केलं जात आहे.आता या संपूर्ण वादावर तुकाराम मुंढे पुढे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




