"दराडेंना मतदारांनीच धडा शिकवला; 'बाप काढणं ही त्यांची संस्कृती' भावाच्या विजयानंतर गणेश गीतेंचा घणाघात"
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.या विजयानंतर गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांनी नरेंद्र दराडे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीतील घडामोडींवर भाष्य करताना गणेश गीते म्हणाले की, त्यांनी कोणतीही छुपी यंत्रणा राबवली नव्हती. शिवसेनेला जागा सुटल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती.

दराडे यांच्या पराभवाचे कारण सांगताना गणेश गीते यांनी दावा केला की, सुरुवातीपासूनच शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात मतदारांमध्ये मोठा नाराजीचा सूर होता. त्यामुळे मतदारांनी गोकुळ गीतेंच्या बाजूने कौल दिला.यावेळी त्यांनी नरेंद्र दराडेंवर थेट निशाणा साधत, "कोणाचा बाप काढणं ही दराडेंची संस्कृती आहे. आम्ही कधीही अशी भाषा वापरलेली नाही. लोकांनी गोकुळ गीतेंना भरभरून साथ दिली," असे वक्तव्य केले.
तसेच, गेल्या आठ वर्षांत दराडे यांनी मतदारांशी संपर्क ठेवला नाही, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी झाले नाहीत आणि जनतेच्या कामांसाठी पुढाकार घेतला नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळेच मतदारांनी त्यांना नाकारल्याचे गणेश गीते म्हणाले.दरम्यान, गोकुळ गीते हे लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मात्र, त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत ते स्वतःच निर्णय घेतील, असे गणेश गीते यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या राजकीय भूमिकेबाबत बोलताना गणेश गीते यांनी, "मी भारतीय जनता पक्षातच राहणार असून गिरीश महाजन यांच्यासोबतच कायम काम करणार आहे," असे ठामपणे सांगितले.




