दिशा सालियन प्रकरणात सूरज पांचोलीचा खुलासा: "ना दिशाला ओळखतो, ना आदित्य ठाकरेंना भेटलो"

दिशा सालियन प्रकरणात सूरज पांचोलीचा खुलासा: "ना दिशाला ओळखतो, ना आदित्य ठाकरेंना भेटलो"

 मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियाद्वारे निवेदन जारी करत मौन सोडले आहे. या प्रकरणाशी संबंधित सीबीआयच्या एफआयआरमध्ये (FIR) आपले नाव समाविष्ट असल्याचा दावा वकील निलेश ओझा यांनी केल्यानंतर सूरजने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

 "मी आयुष्यात दिशा सालियनला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधीही भेटलेलो नाही. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचीही मी कधी भेट घेतलेली नाही," असा दावा सूरजने केला आहे. दिशाच्या मृत्यूशी आपला संबंध जोडणारा कोणताही पुरावा अस्तित्वात नसताना नाव गोवले जात असल्याबद्दल त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

 आपल्या निवेदनात सूरजने खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:

तपासात पूर्ण सहकार्य:
"मी बराच काळ शांत होतो, परंतु आता सत्य समोर येणे गरजेचे आहे. तपास यंत्रणांनी काही वर्षांपूर्वीच माझा जबाब नोंदवला आहे. सीबीआय किंवा अन्य यंत्रणांना पुन्हा चौकशी करायची असल्यास मी पूर्ण सहकार्यासाठी तयार आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन:
"टीव्हीवरील चर्चा, सोशल मीडियावरील दावे किंवा बातम्या म्हणजे पुरावा नव्हे. केवळ खळबळजनक शीर्षकांमुळे सत्य बदलत नाही."

दोषींवर कारवाईची मागणी:
दिशा सालियनच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पुराव्यांशिवाय खोट्या कथा रचून इतरांची बदनामी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हावी.

दरम्यान, दिशा सालियन प्रकरणाचा सीबीआय आणि इतर यंत्रणांकडून नव्याने तपास सुरू असतानाच सूरज पांचोलीच्या या खुलाशाने खळबळ उडाली आहे.