नागपूर येथील उमरेड औद्योगिक वसाहतीत भीषण आग; चार कामगारांचा मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. औद्योगिक वसाहतीमधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड या ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर निर्मिती करणाऱ्या कंपनीत शुक्रवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे कंपनीत मोठ्या प्रमाणावर आग लागली असून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर एक कामगार अद्याप बेपत्ता आहे. या दुर्घटनेत ११ कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नागपूरच्या विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाच्या वेळी १५० कामगार कार्यरत
उमरेड एमआयडीसीमधील कंपनीतील स्फोट इतका तीव्र होता की काही सेकंदांतच कंपनीच्या संपूर्ण परिसरात आग भडकली. ॲल्युमिनियम फॉइल तयार करताना वापरली जाणारी ज्वलनशील रसायने आणि उच्च तापमानामुळे आगीने भयंकर रूप धारण केले. स्फोटाच्या वेळी सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कार्यरत होते. अनेक कामगारांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र काहीजण आगीच्या गर्तेत अडकले.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बचावकार्यास गती देण्यात आली.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी काही काळ सुरक्षित अंतर राखण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी यंत्रसामुग्रीतील बिघाड, वीजपुरवठ्यातील अडचण किंवा रसायनांच्या चुकीच्या हाताळणीची शक्यता वर्तवली जात आहे.