भारतातील 'या' श्रीमंत गणेशमंडळाने 'इतक्या' कोटींच्या विमा पॉलीसीने बनवला विक्रम
मुंबई - मुंबई म्हटलं की गणेशोत्सवाची धामधूम डोळ्यांसमोर येते. लालबागचा राजा, अंधेरीचा गणेश, गिरगावचा गणपती या सगळ्यांमध्ये एक नाव मात्र नेहमी विशेष ठरतं, ते म्हणजे माटुंग्याच्या किंग्ज सर्कलमधील जीएसबी सेवा मंडळ. दरवर्षी भक्तिभाव, शिस्त, परंपरा आणि भव्यतेचं अनोखं मिश्रण इथं पाहायला मिळतं. मात्र यंदा मंडळाने एक असा विक्रम केला आहे की सगळ्यांचं लक्ष तिकडेच लागलं आहे. तब्बल ४७४.४६ कोटी रुपयांचा विमा!

भारतातील सर्वात मोठा गणेशोत्सव विमा -
इतका मोठा विमा आजपर्यंत देशातील कोणत्याही सार्वजनिक गणेशोत्सवाने घेतला नव्हता. त्यामुळे हा विक्रम जीएसबी सेवा मंडळाच्या नावावर नोंदवला गेला आहे.
मागील तीन वर्षांतील विमा रक्कम :
2023 – ₹360.40 कोटी
2024 – ₹400 कोटी
2025 – ₹474.46 कोटी
सोन्या-चांदीच्या वाढत्या किंमती, स्वयंसेवक व सुरक्षारक्षकांची वाढती संख्या, तसेच भाविकांची गर्दी लक्षात घेता ही विम्याची रक्कम दरवर्षी वाढत आहे. विमा न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत घेतला गेला आहे.
४७४ कोटींच्या विम्यात काय समाविष्ट ?
₹375 कोटी – स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांचा अपघात विमा
₹67 कोटी – बाप्पांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा विमा
₹30 कोटी – सार्वजनिक दायित्व विमा (गर्दीमुळे होणाऱ्या अपघातासाठी)
₹2 कोटी – आग, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी
₹43 लाख – मंडप परिसरासाठी विशेष विमा
यंदा गणपती बाप्पाला ६६ किलो सोने आणि ३३६ किलो चांदीचे दागिने चढवले जाणार आहेत.
परंपरा आणि भक्तीचा संगम
जीएसबी सेवा मंडळ फक्त श्रीमंतीसाठी ओळखलं जात नाही, तर इथली परंपरा आणि भक्तिभाव सगळ्यांना भावतो.
मूर्ती शाडू मातीची – पर्यावरणपूरक
रंग – पूर्णतः नैसर्गिक
वाद्य – पारंपरिक दक्षिण भारतीय संगीत; कुठलाही रेकॉर्डेड म्युझिक नाही
बाप्पाला प्रेमाने म्हणतात – "नवसाला पावणारा, विश्वाचा राजा"
अनोख्या परंपरा जपणारे मंडळ
तुळाभार विधी – भक्ताचं वजन अन्नधान्य, फळं किंवा नारळांनी तोलून ते दान केलं जातं
महाहदस्थान – पंडालमधील अन्न भक्त घरी नेतात आणि आशीर्वाद मानतात
नारळ फोडण्याची परंपरा – सकाळच्या पूजनानंतर नारळ फोडून तो प्रसाद म्हणून वाटला जातो
मुंबईतील गणेशोत्सवाचं विशेष स्थान
गणेशोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो, पण मुंबईतील उत्सवाचा वेगळाच रुबाब आहे. अनेकांच्या मते, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच मुंबईतून झाली. बॉलिवूडपासून सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांचं हे भावविश्व. पण जीएसबी सेवा मंडळाचा उत्सव केवळ वैभवशालीच नाही, तर श्रद्धेने समृद्ध आहे.
आज जिथे अनेक ठिकाणी केवळ पैशाचं प्रदर्शन केलं जातं, तिथे जीएसबी सेवा मंडळ आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतं. खरा उत्सव हा भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकतेत असतो. विम्याचा आकडा नक्कीच दखलपात्र आहे, पण या मंडळाची खरी ओळख आहे. भाविकांची निष्ठा आणि पारंपरिक गणेशभक्ती.




