नीट पेपरफुटीवर संसदेत बोलू शकलो नाही कारण; ओमराजे निंबाळकरांनी दिलं स्पष्टीकरण

नीट पेपरफुटीवर संसदेत बोलू शकलो नाही कारण; ओमराजे निंबाळकरांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई (प्रतिनिधी) : देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षा गोंधळावरून दिल्लीत मोठे आंदोलन झाले आणि त्याचे पडसाद संसदेतही उमटले. या पार्श्वभूमीवर नीट प्रकरणावर संसदेत भूमिका न मांडल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका होत होती. मात्र, यावर त्यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान त्यांच्या पक्षाचे लोकसभेतील गटनेते श्रीकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना संसदेत प्रभावीपणे मांडल्या. त्या चर्चेत दुसरा वक्ता मी होतो. मात्र, दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे मला माझी भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नीट ही वर्षातून एकदाच होणारी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी परीक्षा आहे. अशा परीक्षेत पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. त्यांच्या मनातील वेदना आणि संताप समजून घेणे गरजेचे होते. श्रीकांत शिंदे यांनी त्या भावना लोकसभेत मांडल्या. वेळ मिळाला असता तर मीही तीच भूमिका मांडली असती.

ओमराजे निंबाळकर यांनी उदाहरण देत सांगितले की, एखाद्या लोकप्रतिनिधीची निवडणूक गैरप्रकारामुळे रद्द झाली तर त्याची मानसिक अवस्था काय होईल, याचा विचार करा. निवडणूक पाच वर्षांनी येते, पण नीट परीक्षा विद्यार्थ्यांचे संपूर्ण आयुष्य ठरवणारी असते. त्यामुळे माझ्या संवेदना विद्यार्थ्यांसोबत आहेत.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारनेही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी लोकांचे प्रश्न मांडणे आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच आमची जबाबदारी आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहीन, असेही त्यांनी स्पष्ट केले.