पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी बोलणे अयोग्य; सुनील तटकरे धनंजय मुंडेंवर नाराज

पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदारांनी बोलणे अयोग्य; सुनील तटकरे धनंजय मुंडेंवर नाराज

मुंबई: बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार धनंजय मुंडे यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाव न घेता कान टोचले आहेत. "पालकमंत्र्यांच्या बैठकीत किंवा पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसणे ठीक आहे, पण मुख्य व्यक्ती बोलत असताना स्वतः पुढाकार घेऊन भाग घेणे योग्य नाही," असा सल्ला तटकरेंनी धनंजय मुंडेंना दिला आहे.

नेमके काय म्हणाले सुनील तटकरे?

मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे म्हणाले, "पत्रकार परिषद ही प्रमुख मंत्र्याची असते. सुनेत्रा पवार या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि पालकमंत्री आहेत, त्या प्रसारमाध्यमांसमोर त्यांची बाजू समर्पकपणे मांडू शकतात, असा विश्वास पक्षाला आहे. मध्यंतरी चंद्रशेखर बावनकुळे माझ्या जिल्ह्यात आले असताना मी त्यांच्या बाजूला बसलो होतो, पण मी बोललो नाही. मुख्य व्यक्ती पत्रकारांशी बोलत असताना बाजूला बसलेल्यांनी ते भान ठेवले पाहिजे."

तसेच, बीडमध्ये नेमका काय प्रसंग घडला याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ आणि पक्षाचे सर्व सहकारी यापुढे अधिक जबाबदारीने वागतील, असा विश्वासही तटकरेंनी व्यक्त केला.

धनंजय मुंडेंचे स्पष्टीकरण काय?

दुसरीकडे, बीडमधील त्या प्रसंगावर आमदार धनंजय मुंडे यांनी स्वतःची बाजू मांडली आहे.

मुंडे म्हणाले, "सुनेत्रा वहिनी आपलं दुःख विसरून जनतेच्या सेवेसाठी बीडला आल्या होत्या. अजितदादांच्या कामांचा विषय आल्यावर त्या अत्यंत भावनिक झाल्या होत्या. त्यांचा हुंदका कधीही बाहेर पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा संवेदनशील वेळी माध्यम प्रतिनिधींनी थोडे भावनिक होऊन प्रश्न विचारणे थांबवायला हवे होते, म्हणूनच मी मध्यस्थी करत 'आता आपण थांबले पाहिजे' असे म्हटले होते."

तसेच, बीडमधील ९५ टक्के पत्रकार उत्तम काम करतात, मात्र काही मंडळींना जिल्ह्याचे वातावरण शांत होऊ द्यायचे नाही आणि जातीपातीचे राजकारण सुरु ठेवायचे आहे, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.