प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक; भुजबळांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा

प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक; भुजबळांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या 24 रिक्त जागा आणि पोटनिवडणुकीसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून प्रत्येकी 3, झारखंडमधून 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममधून प्रत्येकी 1 जागेचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, महाराष्ट्रातील आणि तामिळनाडूमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील याच दिवशी होईल. आगामी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील. याचदरम्यान, एक महत्वाची घडामोड घडत असल्याचं दिसून येत आहे. माजी खासदार नवनीत राणा यांचा राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची उमेदवारी लवकरच जाहीर केली जाणार आहे. यासाठी नवनीत राणा यांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळावी, यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र आपल्या कोट्यातील जागा नवनीत राणा राष्ट्रवादीसाठी सोडणार का? हा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे या भेटीगाठीमुळे सुनेत्रा पवारांच्या जागी नवनीत राणा यांची वर्णी लागते का? हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. तर राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला आता केवळ १ दिवस बाकी आहे, या अनुषंगाने प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक सुरु आहे. 

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बैठकीला पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहेत. आजच्या बैठकीत उमेदवारी बाबत चर्चा झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत उद्या बैठक पार पडण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी सध्या छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे. पार्थ पवार यांच्याकडून देखील काही नावांचा आग्रह धरण्यात आला आहे, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.