बालिंगा–दाजीपूर रस्त्याच्या बाजूपट्टीवर तांबड्या मातीचा भराव , रस्त्याचा दर्जा रामभरोसे ?

बालिंगा–दाजीपूर रस्त्याच्या बाजूपट्टीवर तांबड्या मातीचा भराव , रस्त्याचा दर्जा रामभरोसे ?

करवीर (प्रतिनिधी) : विश्वनाथ मोरे 

बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गाच्या रस्ते कामाला सुरुवात होऊन आता वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत रस्तेकामाच्या संदर्भात अनेकवेळा स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, संघटना यांच्याशी वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. अनेकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कामाला गती व नियमितपणा आल्याचे दिसून आले.पण बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील शिरोली दुमाला ता. करवीर येथील अलीकडेच काँक्रिटिकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्टीवर दर्जेदार मुरुमाऐवजी थेट तांबडी माती टाकली जात आहे. बाजूपट्टीवर मातीचा भराव टाकल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.  

 सावरवाडी - शिरोली दुमाला - सावर्डे दुमाला - आरळे - घानवडे ते पुढील गावे असा एकेरी बाजूने काँक्रीटीकरण तसेच सावरवाडी ते सावर्डे दुमाला पूर्ण रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मुख्य रस्ता काँक्रिटचा असला तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेली मजबूत बाजूपट्टी, योग्य कॉम्पॅक्शन आणि पाण्याचा निचरा याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात या मातीची धूप होऊन रस्त्याच्या कडेला चिखल होणे, खड्डे पडण्याची तसेच अपघाताचा धोका वाढण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

काँक्रिट रस्ता मजबूत असला तरी बाजूपट्टी कमकुवत असेल तर वाहन बाजूला घेताना घसरण्याची शक्यता वाढते. काँक्रिट रस्त्यांच्या कडेला पक्का मुरुम वापरून व्यवस्थित दाबणी (कॉम्पॅक्शन) करणे आवश्यक असते. फक्त माती टाकल्यास पावसाळ्यात ती वाहून जाऊन रस्त्याच्या कडेला पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला क्रॅक पडणे, कडे खचणे किंवा वाहनांचे टायर घसरणे यांसारखे प्रकार संभवतात. त्यामुळे संबंधित कॅन्स्ट्रक्शन कंपनी, संबंधित प्रशासन विभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.