बिहारच्या जमुई प्रकरणावर रोहिणी खडसे यांचा संताप; "ही अंधभक्तांची जमात उद्या सरकारलाच लक्ष करेल

बिहारच्या जमुई प्रकरणावर रोहिणी खडसे यांचा संताप; "ही अंधभक्तांची जमात उद्या सरकारलाच लक्ष करेल

जळगाव : बिहारमधील जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन तरुण-तरुणीशी समाजकंटकांकडून करण्यात आलेल्या असभ्य वर्तन आणि छेडछाडीच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही वाढती 'अंधभक्तांची जमात' असून यांना कायद्याची कोणतीही भीती राहिली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानेही संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले असून, पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

मन हेलावून टाकणारी घटना आणि रोहिणी खडसेंचा संताप
बिहारमधील जमुई येथे एका १० वीत शिकणाऱ्या मुलीला तिच्या साथीदाराला काही समाजकंटकांनी रस्त्यात अडवून छेडछाड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, हा व्हिडिओ मन हेलवणारा आणि चीड आणणारा आहे.तथाकथित 'संस्कृती रक्षकांनी' अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. महाराष्ट्रातील सिंहगडावरील एका घटनेचा दाखला देत, वर्षांच्या चिमूरडीला बरमूडा घातल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांना मारहाण झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. ही अंधभक्तांची जमात अशीच फोफावत राहिल्यास, उद्या हेच लोक सरकारमधील लोकांनाही आपले लक्ष्य करतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. शासनाने यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महिला आयोगाचे कडक निर्देश
 या संपूर्ण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (सुमो मोटो) गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तात्काळ एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हिडिओ फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना निश्चित कालमर्यादेत अटक करावी आणि निष्पक्ष चौकशी करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

पोलीस प्रशासनाची कारवाई; तिघे अटकेत
 या प्रकरणाची पुष्टी करताना जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या जबाबानूसार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते जण दिसत असून, त्यापैकी काहींची ओळख पटवण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.