आ. संग्राम जगताप यांच्या 'त्या' वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली नाराजी व्यक्त
मुंबई - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आयोजित हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटीचे आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांना "दिवाळीची खरेदी केवळ हिंदू व्यावसायिकांकडूनच करावी" अशी विनंती केली. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "संग्राम जगताप यांचे विधान मला मान्य नाही. त्यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवणार आहोत. पक्षाची ठरलेली धोरणं आणि विचारसरणी असताना, कोणताही आमदार, खासदार किंवा जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करणे पक्षाला अजिबात मान्य नाही."
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, "अरुणकाका जगताप हयात असताना सोलापुरात सर्व काही सुरळीत होतं. आता संग्राम यांच्यावर अधिक जबाबदारी आहे. वडिलांचं छत्र नसल्यामुळे अधिक जबाबदारीने वागायला हवं. महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे."
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेही उघड केले की, "मी एका कार्यक्रमात आ. संग्राम जगताप यांना आधीच सूचना दिली होती. तेव्हा त्यांनी सुधारणा करणार असल्याचं सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात काहीही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे पक्ष त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही आणि त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे."




