भांडुपमध्ये अनियंत्रित ई-बसचा थरार, तर वाशीत चालकाला फिट आल्याने मोठा अनर्थ टळला
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत BEST बसशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. एका बाजूला भांडुपमध्ये अनियंत्रित ई-बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली, तर दुसऱ्या बाजूला वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फिट आल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

भांडुपमधील कोकणनगर परिसरात क्रिटिकल रुग्णालयाजवळ BESTची ई-बस अचानक भरधाव झाली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली आणि एका पादचाऱ्यालाही चिरडले. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अतुल पडाळे नावाचे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाचे नियंत्रण का सुटले आणि तांत्रिक बिघाड होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.दरम्यान, सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावर आणखी एक धक्कादायक घटना घडली. वडाळा डेपोहून घणसोलीकडे जाणाऱ्या BEST बसचे चालक किरण जाधव यांना बस चालवत असतानाच अचानक फिट आली. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन धडकली.
मात्र, या वेळी बसचे वाहक किशोर गुरव यांनी प्रसंगावधान राखत तातडीने हस्तक्षेप केला. त्यांच्या तत्परतेमुळे बस इतर वाहनांना किंवा पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वीच सुरक्षितपणे थांबवण्यात आली. या अपघातात चालकाच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली, तर दोन प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्या. धडकेमुळे बसची समोरील काच फुटली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही घटना वाशी खाडी पुलावर घडली असती तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे वाहकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईतील या सलग दोन घटनांमुळे BEST बसच्या सुरक्षिततेसंदर्भात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.




