डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

डॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या 'डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी' येथे पदवी इंजिनिअरिंग (बी. टेक.) प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनमान्य 'स्कुटीनी केंद्र' (सुविधा केंद्र) कार्यान्वित करण्यात आले आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संस्थेने विशेष नियोजन केले आहे.

या केंद्रात ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग, पडताळणी, अपलोड करणे आणि अर्ज निश्चिती या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत कॅप राऊंडची माहिती आणि इंजिनिअरिंगनंतरच्या करिअर व नोकरीच्या संधींविषयी मार्गदर्शन केले जात आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांची सविस्तर माहितीही येथे मिळणार आहे.

प्रवेश प्रक्रियेचा वेग लक्षात घेता सुट्टीच्या दिवसांतही म्हणजेच रविवारसह सर्व दिवस हे केंद्र सुरू राहणार आहे. राज्य सीईटी सेलद्वारे आयोजित प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चितीची मुदत १२ जुलैपर्यंत आहे. प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीदर्शक फलक प्रदर्शित केले आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आणि व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांना या मोफत सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.