भाजपचा अभेद्य गड कसा ढासळला? बांकीपूरमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयामागची 5 मोठी कारणं

भाजपचा अभेद्य गड कसा ढासळला? बांकीपूरमध्ये प्रशांत किशोरांच्या विजयामागची 5 मोठी कारणं

मुंबई (प्रतिनिधी) : बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख शांत किशोर यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात त्यांनी तब्बल 19 हजार 324 मतांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधले.

या निवडणुकीत प्रशांत किशोर यांना 63,203, भाजपचे नीरज सिन्हा यांना 44,250, तर आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना 14,085 मते मिळाली. चार वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा हा मतदारसंघ राहिल्याने येथे भाजपचा पराभव मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

या निकालामागे काही महत्त्वाची कारणे समोर येत आहेत. पहिलं म्हणजे, भाजपची पारंपरिक सवर्ण मतपेढी अपेक्षित प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडली नाही, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांना मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं, तसेच यादव समाजातील तरुण मतदारांचाही कल त्यांच्या बाजूने राहिल्याचं बोललं जात आहे.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांचा ग्राऊंड लेव्हलवरील प्रचार. मोठ्या सभा घेण्याऐवजी त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला, तर भाजपकडून अतिआत्मविश्वासामुळे प्रचारात काहीशी ढिलाई झाल्याची चर्चा आहे.

तिसरं कारण म्हणजे तरुण मतदारांचा वाढलेला सहभाग. जंतर-मंतरवरील आंदोलन आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांमुळे राज्य सरकारविरोधात तरुणांमध्ये नाराजी होती. त्याचा फायदा प्रशांत किशोर यांनी प्रचारात घेतल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

चौथं कारण म्हणजे भाजपमधील उमेदवारीचा गोंधळ. सुरुवातीला जाहीर केलेल्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर शेवटच्या क्षणी उमेदवार बदलावा लागला. याचा परिणाम प्रचारावर आणि मतदारांवर झाल्याचं मानलं जात आहे.

तर पाचवं कारण म्हणजे राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं. काही समाजघटकांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि पारंपरिक मतपेढीतील बदल याचाही फटका भाजपला बसल्याचं बोललं जात आहे.

या निकालामुळे बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांची ताकद वाढल्याचं मानलं जात असून, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी हा विजय महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.