मराठा आरक्षण ही न्याय्य मागणी, 'कोल्हापूर गॅझेट' तातडीने लागू करा : खासदार शाहू महाराज छत्रपती
कोल्हापूर: गणेश चतुर्थीच्या मंगल पर्वावर खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या निवासस्थानी पारंपरिक आणि शाही थाटात श्री गणरायाचे आगमन झाले. बाप्पाची विधिवत प्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांनी समस्त कोल्हापूरकर व देशवासीयांच्या सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी साकडे घातले. या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अत्यंत खंबीर भूमिका मांडत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

'कोल्हापूर गॅझेट'ची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही त्यांची अत्यंत न्याय्य मागणी असून मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत, त्या पूर्णपणे योग्य आहेत." पुढे बोलताना त्यांनी 'कोल्हापूर गॅझेट'चा मुद्दा विशेषत्वाने अधोरेखित केला. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आणि मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सरकारने आता 'कोल्हापूर गॅझेट' तातडीने लागू करावे, अशी थेट मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे यांच्या मागण्यांना आणि 'कोल्हापूर गॅझेट'च्या अंमलबजावणीला पाठिंबा दिल्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे नैतिक बळ मिळाले आहे.




