महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक; न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढणार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक; न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढणार

मुंबई:  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार, खासदार नारायण राणे यांच्यासह सीमा भागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित होते. या बैठकीत बेळगाव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चार करत सीमाप्रश्नाची न्यायालयीन लढाई अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार सर्व नेत्यांनी एकमताने केला. 

विधिमंडळात शरद पवारांचे जंगी स्वागत
सीमाप्रश्नी सुरुवातीच्या काळापासून लढा देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार तब्बल ३० वर्षांनंतर (यापूर्वी १९९६ मध्ये) या बैठकीला उपस्थित राहिले. त्यांच्या आगमनामुळे विधिमंडळात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत सुमारे अर्धा तास विविध कायदेशीर बाबींवर चर्चा झाली.

रोहित पवारांची शरद पवारांच्या बैठकीला दांडी; शिक्षक आंदोलनात हजेरी
सीमाप्रश्नाची बैठक संपल्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत एक स्वतंत्र बैठक घेतली. मात्र, या बैठकीला आमदार रोहित पवार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली. मुंबईत असतानाही रोहित पवारांनी शरद पवारांच्या बैठकीऐवजी आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देणे पसंत केले. रोहित पवारांनी यापूर्वी 'आपण आंदोलनाला उशिरा पोहोचू' असे ट्विट केले होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी पक्षाच्या बैठकीला दांडी मारत शिक्षक आंदोलनात सहभागी होणे पसंत केल्याचे दिसून आले.