महालक्ष्मी चेंबर्स - सीबीएस परिसरातील वाहतूक नियमनासाठी वाहतूक शाखेची कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) परिसरातील महालक्ष्मी चेंबर्ससमोर दुचाकींचे डबल पार्किंग, चारचाकी व इतर वाहनांचे अनधिकृत पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे एस.टी. बसेस तसेच अन्य वाहनांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय परिख पुल परिसरात महापालिकेचे क्रॉकीट रस्ता व गटार बांधकाम सुरू असल्याने वाहतूक आणखीनच कोंडीत अडकण्याची शक्यता वाढली आहे. पादचाऱ्यांची सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी महालक्ष्मी चेंबर्ससमोर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, पो.नि. शाहूपुरी संतोष डोके व पो.नि. (शहर वाहतूक) नंदकुमार मोरे यांनी संयुक्तपणे परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर, महालक्ष्मी चेंबर्सजवळील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने डबल पार्किंग केलेली दुचाकी हटविणे, चारचाकी, रिक्षा, जीप व खाजगी प्रवासी वाहने येथे पार्क होऊ न देणे यासाठी मोहीम राबवली. पो.नि. नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जाधव व पथकाने क्रेनद्वारे अनाऊन्समेंट करत सर्व चुकीची वाहने जागेवरून हटवली असून आवश्यकतेनुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येते की, महालक्ष्मी चेंबर्ससमोर दुचाकींचे डबल पार्किंग करू नये तसेच चारचाकी, रिक्षा किंवा खाजगी प्रवासी वाहने रस्त्यावर पार्क करू नयेत. नियोजित पार्किंग ठिकाणीच वाहन उभी करावीत. अन्यथा बेशिस्त पार्किंग केल्यास ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून देण्यात आला आहे.




