मुंबईच्या महापौर की ब्रिटनच्या महाराणी? बंगल्याच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटींची उधळपट्टी; मुंबईकर संतप्त
मुंबई : मुंबई शहराच्या विकासाच्या नावाखाली मुंबई महानगरपालिकेकडून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. भायखळा येथील महापौर बंगल्याच्या बाहेरील परिसराच्या विकासासाठी आता तब्बल २ कोटी ८९ लाख रुपयांचे नवीन टेंडर काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या चार ते सहा महिन्यांच्या कालावधीत महापौर बंगल्याच्या नूतनीकरण आणि सुशोभीकरणावर आधीच ४ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता लागोपाठ तिसरे टेंडर काढण्यात आल्यामुळे "हा मुंबईच्या महापौरांचा बंगला आहे की ब्रिटनच्या महाराणींचा राजवाडा?" असा संतप्त सवाल मुंबईकर आणि विरोधक विचारत आहेत.

मुंबई महापालिकेच्या हजारो कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (Fixed Deposits) मोडून खर्च करण्यावरून आधीच विरोधक सत्ताधारी भाजप-शिवसेनेला धारेवर धरत आहेत. अशातच महापौर रितू तावडे यांच्या भायखळा येथील शासकीय बंगल्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
६ महिन्यांत खर्चाचा डोंगर; कसे वाढले ७ कोटी?
· पहिली पायरी (७५ लाख रुपये): भायखळा येथील बंगल्यात नवीन महापौर वास्तव्याला येण्यापूर्वी दुरुस्ती आणि प्राथमिक सुशोभीकरणासाठी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आले.
· दुसरी पायरी (३ कोटी ४० लाख रुपये): हे काम कमी पडले म्हणून की काय, पालिकेच्या स्थायी समितीने बंगल्याच्या नूतनीकरणासाठी आणखी ३ कोटी ४० लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि ते काम पूर्ण करण्यात आले. (एकूण ४.१५ कोटी)
· तिसरी पायरी (२.८९ कोटी रुपयांचे नवीन टेंडर): आता बंगल्याच्या बाहेरील परिसराचे सौंदर्य वाढवणे आणि सुविधा पुरवण्यासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचे तिसरे टेंडर जारी करण्यात आले आहे.
नवीन टेंडरमध्ये काय कामे होणार?
या २.८९ कोटी रुपयांच्या टेंडरअंतर्गत ई. एस. पाटनवाला मार्गालगत वाहतुकीचा आवाज बंगल्यात जाऊ नये म्हणून 'नॉइज बॅरिअर' (Noise Barrier) उभारणे, नवीन पर्जन्यजल व सांडपाणी वाहिन्या टाकणे, इंटरलॉकिंग काँक्रीट पेव्हर्स बसवणे, तसेच भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्या बांधण्याचे नियोजन आहे.
विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येणार
६ हजार चौरस फुटांच्या या बंगल्यावर अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ७ कोटी रुपये खर्च करण्याची नेमकी गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या अफाट खर्चामुळे येत्या काळात पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय खडाजंगी रंगण्याची शक्यता आहे.




