मुंबईत उघड्या मॅनहोलचा आणखी एक बळी! BMC च्या निष्काळजीपणावर संताप
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत मुसळधार पावसादरम्यान उघड्या मॅनहोलमुळे आणखी एका नागरिकाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील खैराणी रोड परिसरात दुरुस्तीचे काम सुरू असताना उघड्या ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून 45 वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम शेख सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर बोलत रस्त्याने जात होते. त्याचवेळी उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने ते थेट त्यात पडले. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने ते वाहून गेले. सुमारे दोन तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्यांचा मृतदेह उघड्या मॅनहोलपासून सुमारे 20 फूट अंतरावर आढळून आला.
घटनास्थळी महापालिका, अग्निशमन दल, पोलीस आणि 108 रुग्णवाहिका पथकाने संयुक्तपणे बचावकार्य राबवले. मात्र, त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
या घटनेनंतर महापालिकेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मॅनहोल उघडा असतानाही पुरेशी बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा दुर्दैवी अपघात घडल्याचा आरोप होत आहे.
या घटनेवर विविध राजकीय नेत्यांनी आणि स्थानिक प्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घटनेचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत पावसाळ्यात उघडे मॅनहोल, पाणी साचणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे वारंवार जीवितहानी होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेकडून कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




