मैदानावर पांड्या ओरडला, रागावला अन्; तिलक वर्मानं अखेर सगळं सांगून टाकलं

मैदानावर पांड्या ओरडला, रागावला अन्; तिलक वर्मानं अखेर सगळं सांगून टाकलं

मुंबई (प्रतिनिधी) : गुजरात टायटन्सविरुद्ध तिलक वर्मा याने 45 चेंडूत 101 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र त्याची सुरुवात खूपच संथ झाली होती. एकवेळ तो 22 चेंडूत फक्त 19 धावांवर होता. पण त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्यावर ओरडताना दिसला आणि मग तिलकने गियरच बदलला. हार्दिकच्या त्या प्रतिक्रियेनंतर तिलकने अवघ्या 23 चेंडूत 82 धावा चोपल्या.

सामन्यानंतर जियोहॉटस्टारच्या ‘गूगल सर्च एआय मोड मॅच सेंटर लाईव्ह’वर बोलताना तिलक म्हणाला, “सर्वांना माहिती आहे की हार्दिक भाऊ खूप एनर्जेटिक आहेत. ते माझा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी मला सांगितलं, ‘तू करू शकतोस.’ पण मी त्यांना शांत राहायला सांगितलं, कारण मला एकाग्रता ठेवायची होती. मी त्यांना विश्वास दिला की उरलेलं सगळं मी सांभाळेन.”

तो पुढे म्हणाला, “ही खेळी माझ्यासाठी आणि संघासाठी खूप महत्त्वाची होती. मागील चार-पाच सामन्यांत मला क्रीजवर जास्त वेळ घालवता आला नव्हता, त्यामुळे माझा मुख्य उद्देश विकेटवर टिकून राहणं आणि नंतर परिस्थितीनुसार खेळ करणं हा होता. सुदैवाने ते यशस्वी ठरलं. मात्र, आपण खूप पुढचं विचार न करता प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आमच्यासाठी प्रत्येक सामना जवळपास नॉकआउटसारखाच आहे. संघात अनेक वर्ल्ड कप विजेते आणि अनुभवी खेळाडू आहेत. आमच्याकडे कौशल्य आहे, आणि जर आम्ही चांगलं खेळलो, तर आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे डोकं खाली ठेवून सातत्याने मेहनत करणं गरजेचं आहे.”

अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दल आणि आपल्या आवडत्या फलंदाजी क्रमाबद्दल बोलताना तिलक म्हणाला, “मुंबई इंडियन्स जेव्हा अहमदाबादला येते, तेव्हा साधारणपणे आम्हाला काळ्या मातीची, थोडी संथ विकेट दिली जाते. पण आमचे फलंदाज अशा परिस्थितीतही खेळू शकतात. ही विकेट संथ आणि थोडी लो होती, त्यामुळे आम्हाला संतुलन साधत सरळ फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागला. मी परिस्थिती नीट समजून घेतली आणि सरळ शॉट्स खेळण्यावर भर दिला. सुदैवाने मला धावा करता आल्या. मला क्रमांक तीनवर फलंदाजी करायला खूप आवडतं. मात्र, संघाला जिथे गरज असेल तिथे खेळायला मी नेहमी तयार असतो. लहानपणापासूनच मी कोणत्याही क्रमावर आत्मविश्वासाने खेळण्याचा सराव केला आहे. पण कोणी विचारलं, तर माझी पसंती नेहमी क्रमांक तीनलाच असेल.”