मोरेवाडी रस्त्यावर स्ट्रीट लाईट लावाव्यात - जि. प. सदस्य संग्राम पाटील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आर. के. नगर चौक ते मोरेवाडी या रस्त्यावर शेकडो अवजड व प्रवासी वाहनांची सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत वाहतूक सुरू असते. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून मध्यभागी डिव्हायडर लावलेले आहेत. मात्र स्ट्रीट लाइटच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते त्यामुळे या रस्त्यावरील डिव्हायडरवर तात्काळ स्ट्रीट लाइट बसवण्यात याव्यात. याबाबत पाचगाव जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता शिवाजी इंगवले यांना निवेदन दिले.

या रस्त्यावरून विद्यार्थी, नागरिक तसेच कामगार यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू आहे, तसेच वाहनांची ही मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. पथ दिव्यांच्या अभावामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अंधार असतो, त्यामुळे डिव्हायडर दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. हा रस्ता धोकादायक बनला आहे तरी तात्काळ या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.




