राजर्षी शाहू जलतरण तलावाची आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी नगरसेवक विजय जाधव यांच्यासोबत केली पाहणी
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरमध्ये एकूण तीन जलतरण तलाव असून अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील राजर्षी छत्रपती शाहू जलतरण तलाव 2003 रोजी सुरू झाला, यावेळी ऑलिंपिक दर्जाचा तलाव अशी या तलावाची ओळख होती.

अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी सराव करत होते. 2019 पासून हा आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव बंद आहे. 29 एप्रिल रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेऊन त्यांना हा जलतरण तलाव बंद असण्याबद्दल माहिती दिली होती. आयुक्तांनी दिनांक 30 रोजी सकाळी एकत्र हा तलाव पाहणी करण्याचे आश्वासन विजय जाधव यांना दिले होते. सकाळी आठ वाजता आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड व भाजपा जिल्हाध्यक्ष नगरसेवक विजय जाधव,महापौर रूपाराणी निकम, उपशहर अभियंता गुजर, सुरेश पाटील यांनी या जलतरण तलावाची नीट पाहणी केली. हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी नगरसेवक विजय जाधव यांनी काही उपाय योजना करण्याची आयुक्तांकडे मागणी केली. या पाहणीनंतर लवकरात लवकर हा जलतरण तलाव सुरू व्हावा यासाठी लागेल ती मदत महापालिका करेल असे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी आश्वासन दिले.




