राहुल गांधींचा सरकारवर गंभीर आरोप; 'पेलेट गनमुळे विद्यार्थ्याने गमावली दृष्टी'

राहुल गांधींचा सरकारवर गंभीर आरोप; 'पेलेट गनमुळे विद्यार्थ्याने गमावली दृष्टी'

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी NEET आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधत त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील बिघाडासाठी त्यांनाच जबाबदार धरले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली.

राहुल गांधी यांनी आंदोलनात जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिल लोचाब याला सोबत उभे केले. त्यांनी साहिलच्या हातावरील जखमा दाखवत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले की, सरकार पेलेट गनचा वापर झालाच नसल्याचा दावा करत आहे, मात्र शांततेत तिरंगा हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याने याच घटनेत एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे.

दिल्लीतील नजफगडचा रहिवासी असलेला साहिल लोचाब हा दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा विद्यार्थी आहे. 20 जुलै रोजी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान त्याच्या डोळ्यात छर्रा लागल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर एम्सच्या जयप्रकाश नारायण एपेक्स ट्रॉमा सेंटरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी त्याच्या जखमी डोळ्याची दृष्टी परत येण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सांगितले आहे.

साहिलची आई ज्योती यांनी सांगितले की, मुलाला लहानपणापासून पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांमुळे तो आंदोलनात सहभागी झाला होता.दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेतील घडामोडींवरही भाष्य केले. धर्मेंद्र प्रधान पदावर असताना चर्चेला अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली. तसेच, संसदीय चर्चेदरम्यान आपल्याला उत्तर देण्याची संधी नाकारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.