रोहित पवार यांची बैठकीकडे पाठ; शरद पवार यांच्या तटकरे-पटेल प्रशंसेनंतर चर्चांना उधाण

रोहित पवार यांची बैठकीकडे पाठ; शरद पवार यांच्या तटकरे-पटेल प्रशंसेनंतर चर्चांना उधाण

मुंबई (प्रतिनिधी) : मी नाराज असल्याच्या काही चॅनेलवर सुरु असलेल्या बातम्या या निराधार आहेत. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काल काम करणारे आम्ही कार्यकर्ते होतो आणि आजही आहोत. पण माझ्या मतदारसंघातील कुकडी आणि बारामतीतील शेतकऱ्यांसाठी जनाई-शिरसाईच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याने तो सोडवण्यासाठी अचानक सिंचन भवनमध्ये यावं लागलं. कदाचित प्रशासनावर दबाव नसता आणि पाणी सोडण्याचा शब्द त्यांनी पाळला असता तर आज मला पुण्यात सिंचन भवनात येण्याऐवजी मुंबईतील पूर्वनियोजित बैठकीला हजर राहता आलं असतं. असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी दिलंय.

दरम्यान, आमदार रोहित पवार हे त्यांचे आजोबा आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अशातच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक होतेय. पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात असताना, आता स्वतः रोहित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलंय.

पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले कि, एक मात्र खरंय, की आज राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस हा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे आणि त्याच्यासाठी निःसंदिग्धपणे ठोस भूमिका घेण्याची आणि रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज आहे. पक्ष आणि वरिष्ठ नेते याबाबत आज योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत महत्वाच्या घडामोडी घडत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे दोनही बडे नेते नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. अशातच आजच्या या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्यावर चर्चा होणार का? हा सुद्धा मुद्दा महत्वाचा असणार आहे.