लिव्हर ट्रान्सप्लांटनंतर आई - वडिलांचा मृत्यू ; कोवळ्या वयातच पडली भावावर जबाबदारी
पुणे – शहरातील डेक्कन भागातील एका प्रसिद्ध रूग्णालयात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी दाखल झालेल्या बापू बाळकृष्ण कोमकर (वय ५५) यांचं ऑपरेशननंतर निधन झालं, तर त्यांचं यकृत दान करणाऱ्या पत्नी कामिनी कोमकर यांचाही काही दिवसांत मृत्यू झाला. या दुहेरी दुःखद घटनेमुळे त्यांच्या दोन मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बापू कोमकर यांना क्रिएटिनच्या वाढलेल्या पातळीमुळे सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांनी लिव्हर ट्रान्सप्लांट तातडीने करण्याची गरज असल्याचं सांगितलं. पतीचा जीव वाचावा म्हणून पत्नी कामिनी यांनी स्वतः चं लिव्हर दान करण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी कुटुंबाला सूचित केलं होतं की, शस्त्रक्रियेनंतर बापू कोमकर यांचा जीव वाचेलच याची खात्री नाही, मात्र दान करणाऱ्याच्या जीवाला धोका नाही, अशी खात्री दिली गेली होती, असं त्यांच्या मुलानं सांगितलं.
शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात बुधवारी पार पडली. दुर्दैवाने दोन दिवसांनी, शुक्रवारी बापू कोमकर यांचं निधन झालं. कुटुंब अजून या धक्क्यातून सावरतही नव्हतं, तोच आठवडाभरात पत्नी कामिनी यांचाही मृत्यू झाला.
या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या मुलांवर अचानक पालकछत्र हरपण्याचं दुःख ओढावलं आहे. मोठा मुलगा अजून शिक्षण घेत आहे, तर त्याच्या लहान बहिणीची जबाबदारी आता त्याच्यावर येऊन पडली आहे.
"आई - वडिलांच्या उपचारासाठी आम्ही अनेकांकडून कर्ज घेतलं. वडिलांचं ऑपरेशन केलं, पण ते वाचले नाहीत. आता आईही गेली. मी शिकतोय, मामा नाही, काका नाही. आम्ही जगायचं कसं? हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे," अशी वेदनादायी प्रतिक्रिया बापू कोमकर यांच्या मुलानं दिली. "हॉस्पिटलने आमच्या पालकांना गमावलं, आता आम्हाला कोण आधार देणार?"




