लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकमांची एंट्री; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकमांची एंट्री; मुख्यमंत्र्यांचे तातडीचे निर्देश

पुणे (प्रतिनिधी) : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देत या प्रकरणासाठी जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. उज्ज्वल निकम यांनीही ही जबाबदारी स्वीकारण्यास संमती दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आरोपी सिया गोयलच्या कुटुंबीयांकडेही चौकशीचा मोर्चा वळवला असून तिच्या भावाची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि तिचा परिचित चेतन यांच्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असून, या आरोपांची न्यायालयीन सुनावणी अद्याप बाकी आहे.

दुसरीकडे, सियाच्या वडिलांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सियावर लग्नासाठी कोणताही कौटुंबिक दबाव नव्हता. केतन अग्रवाल यांचे स्थळ आल्यानंतर सियाने स्वतःच्या इच्छेने होकार दिला होता आणि ती या नात्याबद्दल आनंदी होती, असा दावा त्यांनी केला.आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आणि जलदगती न्यायालयाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने या चर्चित प्रकरणाच्या तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.