विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज : डॉ. भूषण पटवर्धन
'आयुर्वेद फॉर किड्स', 'योग फॉर किड्स' आणि 'जिनोम ते ओंम' पुस्तकांचे कोल्हापुरात थाटात प्रकाशन
कोल्हापूर/प्रतिनिधी: "आजच्या काळात लहान मुलांचा पोशाख, आहार आणि बोलण्यात भारतीयत्व दिसत नसून त्यांच्यावर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. अशा काळात आपल्या समृद्ध परंपरा आणि संस्कृतीची शिकवण मुलांना देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विज्ञानाची दिशा प्रज्ञानाकडे नेण्याची गरज असून, प्रज्ञानातूनच मानवकल्याणाचा भाव जागृत होईल," असा विश्वास राष्ट्रीय संशोधक व प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केला.

'सकाळ प्रकाशन' आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पटवर्धन लिखित 'आयुर्वेद फॉर किड्स, 'योग फॉर किड्स' आणि 'जिनोम ते ओंम' या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. पटवर्धन पुढे म्हणाले, "या पुस्तकांमधून आयुर्वेदातील बायोटेक्नॉलॉजी आणि योगाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत मांडले आहे. उपनिषदांचा अभ्यास करताना आत्मा, परमात्मा ते जिनोम हा प्रवास उलगडत गेला. विज्ञानाचा शोध म्हणजे सत्याचा शोध असून, त्याचा उपयोग मानवकल्याण, पर्यावरण आणि निसर्गसंवर्धनासाठी व्हावा." ही पुस्तके सध्या इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रकाशित झाली असून लवकरच इतर भाषांत उपलब्ध होतील.
माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे म्हणाले की, "या पुस्तकांतून भारतीय संस्कृती व पाश्चात्त्य संस्कृतीतील संवाद आणि विश्वकल्याणाचा विचार समोर येतो." तर कुलगुरू प्रा. रजनीश कामत यांनी, "ही पुस्तके परंपरा आणि आधुनिकतेतील दरी भरून काढणारी असून आजच्या वाढत्या ताणतणावाच्या काळात मनाला उभारी देणारा अनुभव ठरतील," असे सांगत पुस्तकांचे कौतुक केले.
आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसलोय
डॉ. पटवर्धन यांनी समाजातील घातक बदलांवर भाष्य करताना सांगितले, "आज आपण ज्वालामुखीच्या तोंडावर बसून त्सुनामीची वाट पाहत आहोत, अशी गंभीर परिस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी वारकरी परंपरेचे संस्कार महत्त्वाचे आहेत. तसेच आयुर्वेद, पतंजली आणि चरक यांसारख्या भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश प्राथमिक शिक्षणात झाला पाहिजे."
या सोहळ्यास भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, माजी कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अनुवादक डॉ. जया कुऱ्हेकर, आशुतोष रामगीर यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आशुतोष रामगीर यांनी केले, तर सूत्रसंचालन अजिंक्य पंडित यांनी केले. शेवटी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले.




