विश्वजित कदम यांच्या भगिनी भारती लाड यांचे निधन ; गोड फोटो शेअर करत म्हणाले...

विश्वजित कदम यांच्या भगिनी भारती लाड यांचे निधन ; गोड फोटो शेअर करत म्हणाले...

सांगली: महाराष्ट्राचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे राजकीय वर्तुळात आणि समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे.

भारती विद्यापीठाला दिले लाडक्या लेकीचे नाव 

पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील ‘भारती विद्यापीठा’ला आपल्या लाडक्या कन्या भारती यांच्या नावाने नाव दिले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत्या.

विश्वजित कदम यांची भावनिक पोस्ट 

विश्वजीत कदम यांनी सोशल मिडिया 'एक्स'वर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले, "माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झालं आहे. त्यांच्या प्रेमळ पाठिंब्याने आम्हाला नेहमीच ऊर्जा मिळाली. त्यांच्या जाण्याने आमच्या कदम व लाड परिवारावर मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना."

पतंगराव कदम यांचे २०१८ मध्ये निधन झाले होते. त्यांना चार अपत्ये होती, यापैकी अभिजीत कदम यांचे यापूर्वीच निधन झाले होते. आता भारती लाड यांच्या निधनाने परिवाराला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम आणि बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे.