शार्क टँक फेम नमिता थापर ट्रोल; नमाजचे फायदे सांगणं भोवलं
मुंबई (प्रतिनिधी) :'शार्क टँक इंडिया' या कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसणारी नमिता थापर सध्या ट्रोलिंगमुळे चर्चेत आहे. तिनं अलिकडेच नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितले होते. या कारणामुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. नमाजवर केलेल्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर गदारोळ निर्माण झाला होता. केवळ तिला नाही तर, तिच्या आईलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. दरम्यान, ट्रोलिंगच्या त्रासाला कंटाळून नमिताने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.

ईदनंतर नमिता थापरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तेव्हा या प्रकरणाची सुरूवात झाली. या पोस्टमध्ये तिनं नमाजचे काही शारीरिक आणि मानसिक फायदे सांगितले होते. नमाज दरम्यान केल्या जाणाऱ्या आसनांची माहिती दिली. तिनं सांगितले की, यामुळे शरीराचा पोश्चर, पचनक्रिया आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते. तिने आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही पोस्ट शेअर केली होती.
तिची पोस्ट व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर वाद उफाळून आला. काहींनी तिच्या पोस्टचा धार्मिक दृष्टिकोनाशी जोडून वाद निर्माण केला. ट्रोलिंग वाढताच नमिताने एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं की, ट्रोलिंगची पातळी इतकी खालावली की, लोकांनी तिच्या कुटुंबालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली. कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला, जे अस्वीकार्य आहे, असं तिनं आपल्या व्हिडीओत म्हटलं आहे.
'3 आठवड्यांपासून माझ्यावर वाईट कमेंट्स केल्या जात आहे. माझ्या आईवरही वाईट कमेंट्स करत आहेत. पण का? मी केवळ नमाजचे आरोग्यदायी फायदे सांगितले. मी हेल्थ केअर प्रोफेशनल आहे. मी हिंदू धर्मावर अनेक व्हिडीओ तयार केले आहेत, हेल्थ बेनिफिट्स, सुर्यनमस्कारवर व्हिडीओ तयार केले आहेत. तेव्हा कुणी काहीच बोललं नाही. आम्हाला शिकवलं की, आमचा धर्म, आमची प्रतिष्ठा, हाच आदर आहे का?विशेषत: महिलांसाठी हा आदर आहे का? महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यास सगळे आवाज उठवतात, पण जेव्हा 2 महिलांचा अपमान होतो, तेव्हा ही लोक शांत का? मी यातून खूप शिकले. तुमच्यासाठी कुणी बोलणार नाही. तुम्हालाच स्वत: साठी बोलावं लागेल. मी हिंदू आहे. हिंदू धर्मात कर्माला जास्त महत्व आहे. देव कर्माची परतफेड करतोच. देव बघतोय. निगेटिव्ह रिल्स माझे खूप व्हायरल झाले, आता हा व्हिडीओ व्हायरल करवून दाखवा..', असं व्हिडीओत नमिता म्हणाली.




