शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावेत - शिक्षण सभापती शितल यादव
पन्हाळा( प्रतिनिधी) शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण सभापती शितल यादव यांनी परिषद कन्या व कुमार विद्यामंदिर पोर्ले तालुका पन्हाळा येथील शिक्षण व मान्सूनपूर्व आढावा बैठकत केले.या बैठकीस प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर उपस्थितीत होत्या.

यावेळी बोलताना सभापती शितल यादव यांनी सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी व पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती पदाधिकारी यांनी ज्या शाळेत शिक्षकांची कमतरता असेल तिथे जिल्हा परिषद सदस्य यांनी वैयक्तिक रित्या मानधन देऊन शिक्षकांची नियुक्ती करावी असेही सांगितले.
या कार्यक्रमात अंकुर परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त शिक्षक व पदोन्नती बद्दल गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी सर्व शाळांचा मान्सूनपूर्व आढावा घेत, आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच येत्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव, पूजा पाटील, शोभा बेलेकर,उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे, उपशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.




